- जळगाव (विशेष प्रतिनिधी):
जळगाव जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ती वकील बांधव आणि न्यायव्यवस्थेच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी, तसेच जळगाव येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी जळगावच्या वकील बांधवांनी आमदार राजूमामा भोळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या प्रसंगी वकील बांधवांनी जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीची अत्यंत आवश्यक असणारी गरज आणि जळगाव येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाल्यास जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना वेगाने व सुलभतेने मिळणाऱ्या न्यायसुविधांबाबत आमदार राजूमामा भोळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
आमदार राजूमामा भोळे यांनी वकिलांच्या या रास्त मागण्यांची दखल घेत सकारात्मक आश्वासन दिले. नवीन न्यायालयीन इमारत लवकरात लवकर पूर्ण होऊन उपलब्ध व्हावी यासाठी विविध शासकीय स्तरावर प्रयत्न केले जातील, तसेच गरज भासल्यास विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच जळगाव येथे उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मिळण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनाच्या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिपकराज खडके, ॲड. जहांगीर के., ॲड. गोविंद तिवारी, ॲड. आर. टी. बाविस्कर, जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सागर चित्रे, विद्यमान उपाध्यक्ष ॲड. राजेश गवई, तसेच ॲड. आबासाहेब पी. व्ही. सोनवणे, ॲड. आनंद मुजुमदार, ॲड. सचिन चव्हाण, ॲड. महेश जोशी, ॲड. विजय शर्मा, ॲड. अविनाश खडके, ॲड. दिपक सपके, ॲड. संजय सपकाळे, ॲड. संजय सिग पाटील, ॲड. विक्रम शिंदे, ॲड. योगेश वाणी, ॲड. देवेंद्र सूर्यवंशी यांच्यासह अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगावच्या न्यायव्यवस्थेला आधुनिक, सुसज्ज व सक्षम पायाभूत सुविधा मिळाव्यात, तसेच उच्च न्यायालयीन सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जळगावच्या वकील बांधवांनी दाखवलेली ही एकजुट कौतुकास्पद ठरत आहे.





