ANKUSH TV18 NEWS
चिंचपोकळी विधानसभा-NEWS-
माजी आमदार अरुण गवळी यांची पहिली मुलगी सौभाग्यवती गीता अजय गवळी यांनी प्रभाग क्रमांक २१२ तर त्यांची दुसरी मुलगी योगिता अरुण गवळी यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून आपापले उमेदवारी अर्ज दाखल
भायखळ्याचा विकास करायचा केला निर्धार…!
या भागाचे सर्वेसर्वा आणि चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली अनुक्रमे गीता आणि योगिता यांच्या दोन्ही मुली मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
काल (दि. २६) या दोघींनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. माजी आमदार अरुण गवळी यांना मानणारा मोठा वर्ग यावेळी उपस्थित होता.गवळी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेनेतर्फे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी आमदार अरुण गवळी यांची पहिली मुलगी सौभाग्यवती गीता अजय गवळी यांनी प्रभाग क्रमांक २१२ तर त्यांची दुसरी मुलगी योगिता अरुण गवळी यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी अखिल भारतीय सेनेचे संस्थापक माजी आमदार अरुण गवळी (डॅडी) तसेच या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशा अरुण गवळी (मम्मी) या उपस्थित होत्या. जनतेच्या आशिर्वादाने नक्कीच विजय मिळवून लोकांची कामं करत भायखळ्याचा विकास करायचा, असा निर्धार गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी केल्याचं सांगितलंय. दरम्यान, माजी आमदार अरुण गवळी यांनी आमदारकीच्या माध्यमातून या परिसरात चांगल्या पद्धतीनं कामं केली असल्यामुळे आणि माजी आमदार गवळी यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात असल्यानं गीता आणि योगिता या दोघींना मुंबई महापालिकेची ही निवडणूक सोपी जाणार असल्याचं यानिमित्तानं बोललं जात आहे.
माजी आमदार अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी (मम्मी) या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ‘फेसबुक’ या ‘प्लॅटफॉर्म’वर सदुपयोग…!
माजी आमदार अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी (मम्मी) या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ‘फेसबुक’ या ‘प्लॅटफॉर्म’वर त्यांचे अनेक ‘फॉलोवर्स’ आहेत. या माध्यमातून अध्यात्मिक विषयावर त्या अनेक व्हिडिओ तयार करत आहेत. त्यांच्या व्हिडिओज् ना हजारोंचा प्रेक्षक वर्ग लाभला आहे. मनात येणारे आणि विविध प्रवचनांतून ऐकलेले अध्यात्मिक विचार फेसबुकवर त्या नेहमी टाकत असतात. एका अर्थानं त्या सोशल मीडियाचा सदुपयोग करत असल्याचं बोललं जात आहे.
माजी आमदार अरुण गवळी २१२ आणि २०७ हे दोन्हीही प्रभाग पिंजून काढणार !
मुंबईसह देशभर ज्यांना ‘डॅडी’ या नावानं ओळखलं जातं, त्या माजी आमदार अरुण गवळी यांच्या नावाची या मतदारसंघासह सर्वत्र मोठी ‘क्रेझ’ आहे. विशेष म्हणजे सामान्य शरीरयष्टी असलेल्या आणि सर्वांना आपलंसं करणाऱ्या माजी आमदार अरुण गवळी यांच्या आयुष्यावर तीन ते चार हिंदी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. १९९० च्या दशकात मुंबई आणि परिसरात गवळींचा मोठा दबदबा निर्माण झाला होता. दाऊद इब्राहिमच्या टोळीला धडा शिकविण्याचं काम गवळी यांनी केल्याचं या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये आजही बोललं जात आहे. दरम्यान, त्यांच्या दोन्ही मुलींच्या प्रचाराच्या निमित्तानं माजी आमदार अरुण गवळी २१२ आणि २०७ हे दोन्हीही प्रभाग पिंजून काढणार आहेत.
निवडणुकीनंतर माजी आमदार अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता आणि योगिता गवळी या नक्की कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणार, ?
या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार, या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. सध्या मात्र मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी अनेक राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची नुकत्याच झालेली युतीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुंबई महापालिकेची सत्ता कोणाकडे असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. एकीकडे शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे सर्व पक्ष मुंबई महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेदेखील जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेवर कोणत्या राजकीय पक्षांची सत्ता येईल, या प्रश्नाच्या उत्तराची जशी उत्कंठा आहे, तशीच या निवडणुकीनंतर माजी आमदार अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता आणि योगिता गवळी या नक्की कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणार, याचीदेखील सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.





