Ankush tv18 News
Advocate Vijay B.Danej
मुंबई : महाराष्ट्र परिवहन विभागातील ARTO ते DyRTO पदोन्नती प्रक्रियेत तब्बल २० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत दिनकर कळसकर यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, महाराष्ट्र परिवहन विभागात सध्या ४० हून अधिक ARTO अधिकाऱ्यांच्या DyRTO पदावर पदोन्नतीची प्रक्रिया शासन स्तरावर विचाराधीन आहे. मात्र, या प्रक्रियेपूर्वीच अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत दिनकर कळसकर यांनी मंत्रालय आणि परिवहन सचिवालयातील संपर्कांचा वापर करून पात्र तसेच अपात्र अधिकाऱ्यांकडून प्रत्येकी सुमारे ५० लाख रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या कथित रॅकेटमध्ये मालेगाव येथे कार्यरत ARTO श्रीकृष्ण निळकंठ नकाते यांचाही समावेश असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. नकाते हे देशभरातील ट्रक चोरी आणि चोरीच्या वाहनांच्या पुनर्नोंदणी सिंडिकेटशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत नगर पोलीस स्टेशनमध्ये FIR क्रमांक 119/2020 अन्वये IPC कलम 406, 420, 468, 471, 120-ब, 201 तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली नकाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 21 जून 2021 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून विभागीय चौकशी देखील सुरू आहे.
याशिवाय, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये FIR क्रमांक 30/2023 अंतर्गत देखील नकाते आरोपी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा गुन्हा देखील देशभरातील ट्रक चोरी सिंडिकेटशी संबंधित असल्याचा आरोप आहे. विशेष चौकशी समितीने सादर केलेल्या पुराव्यांची दखल घेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने नकाते यांचा जामीन नाकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यांनी पोलीस कोठडीही भोगल्याचे सांगण्यात आले.
गंभीर आरोप असूनही श्रीकृष्ण नकाते हे सध्या मालेगाव DyRTO कार्यालयात कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या मते, सिंडिकेटमधील इतर आरोपींसह चोरीच्या वाहनांची पुनर्नोंदणी करण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत.
तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी यापूर्वीही ACB कडे तक्रार केल्याचे सांगितले असून, कारवाई होत नसल्याने आता भरत दिनकर कळसकर आणि संबंधित सिंडिकेटविरोधात थेट गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
सीडीआर, बँक व्यवहार, WhatsApp चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. “हा क्राइम इन प्रोग्रेस आहे. सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या या गटाला त्वरित अटक करा,” अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित अधिकारी किंवा परिवहन विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.





