कराड, दि. 29 – कॉलेज परिसरात झालेल्या मारामारी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलासह दोघांना येथील शहर पोलीस ठाण्यातील एका अधिकार्याने अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडून त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करीत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप पिडीत मुलासह त्याच्या कुटूंबाने केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सातारा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे आणि बालकल्याण समितीला दिले आहे. संबंधित पोलीस अधिकार्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार, संबंधित मुलगा सतरा वर्षांचा आहे. विद्यानगर येथे मंगळवारी दुपारी त्या मुलाची अन्य दोघां समवेत मारामारी झाली होती. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तो मुलगा घरी गेला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याला कराड शहर पोलीस ठाण्यातून फोन करून बोलावून घेण्यात आले. संबंधित मुलगा कुटूंबियांसह पोलीस ठाण्यात गेला असता मारामारीतील आणखी दोघे त्याठिकाणी असल्याचे त्याला दिसले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह अन्य तीन कर्मचाऱ्यांनी त्या अल्पवयीन मुलाला शिविगाळ केली. तसेच खोलीचा दरवाजा बंद करून त्या अल्पवयीन मुलासह अन्य दोघांना कपडे काढण्यास सांगीतले. तिघांनाही नग्न करून त्यांना मोबाईलवर अश्लिल चित्रफिती दाखवल्या. तसेच एकमेेकांना गुप्तांगावर मारहाण करण्यास सांगीतले. हा प्रकार करीत असतानाच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्याने त्यांच्या मोबाईलवर व्हिडीओ चित्रिकरण केले. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित अल्पवयीन मुलासह अन्य दोघांकडे त्यांनी पैशांची मागणी केली. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिघांना सोडण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत संबंधित मुलागा त्याच्या नातेवाईकांसमवेत एका सत्ताधारी वजनदार नेत्याला भेटला. त्यानंतर त्यांनी सातारा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर बालकल्याण विभागालाही निवेदन देऊन संबंधित पोलीस अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात केली आहे.
दरम्यान कॉलेज वरील झालेला वाद हा कराड व कोपर्डेकरांचा नेहमीचा वाद आहे. मंगळवारी वादाची घटना घडल्यानंतर गुरुवारपर्यंत त्या घटनेच्या अनुषंगाने या घडामोडी घडल्या. मात्र एका जबाबदार अधिकाऱ्याने व त्याच्या समवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेले हे दुष्कृत्य कराड शहर पोलीस स्टेशन तसेच कराड शहराला काळिंबा फासणारा आहे. यापूर्वीही येथिल पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकाऱ्याने केलेल्या जबरी मारहाणीचा व त्यामध्ये मृत्यू झालेल्या घटनेची आज ही चर्चा सुरू असताना काल झालेल्या कृत्याची व पोलीस दलाची चर्चा सुरू झाली आहे.






