ANKUSH TV18NEWS
ADV.VIJAY B.DANEJ
जळगाव : शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केल्याने नागरिकांनी स्वागत केले असले, तरी दुसरीकडे काही ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेषतः दाना बाजार परिसरातील “नीलम वाईन” दुकानाबाहेर अनेकदा दारुड्यांची गर्दी होत असून, दुकानासमोरच खुलेआम दारू पिण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. संबंधित दुकान हे एका आमदाराशी संबंधित असल्याची चर्चा शहरात रंगत असून, त्यामुळेच प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

तसेच इच्छा देवी चौकाजवळील महामार्ग परिसरात असलेल्या “अशोक वाईन” बाहेरही रात्री उशिरापर्यंत खुलेआम मद्यपान सुरू असल्याचा आरोप आहे. वाहनांची गर्दी, दारुड्यांचा गोंधळ आणि महिलांना होणारा त्रास यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
याशिवाय स्टेशन रोडवरील रामनिवास समोर असलेल्या वाईन शॉप परिसरातही रात्री मद्यपानाचा धुमाकूळ सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे; मात्र काही ठिकाणी कारवाई तर काही ठिकाणी दुर्लक्ष, अशी दुहेरी भूमिका का? असा प्रश्न जळगावकरांनी उपस्थित केला आहे.
“सामान्य नागरिकांवर नियम आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित ठिकाणी मूक भूमिका, हे योग्य नाही. शहरातील सर्वच वाईन शॉपसमोर समान नियम लागू करून कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधित ठिकाणी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





