Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. “पाणी जपून वापरा” — गुलाबराव पाटील -पालकमंत्र्यांचे आवाहन

ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. “पाणी जपून वापरा” — गुलाबराव पाटील -पालकमंत्र्यांचे आवाहन

ANKUSH TV18 NEWES -ADVOCATE -VIJAY B.DANEJ

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन; धरणगाव तालुक्यातील ११ गावांना मोठा दिलासा

जळगाव, दि. १४ मे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून उद्या दि. १५ मे २०२६ रोजी अजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत हा निर्णय घेतला आहे.

निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी अजनी धरणातून सुमारे १५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उन्हाळ्याच्या कडाक्यात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या ग्रामस्थांसाठी हे आवर्तन जीवनदायी ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार हे आवर्तन पिंप्रीमार्गे सोनवदपर्यंत सोडण्यात येणार आहे.

या आवर्तनाचा लाभ धरणगाव तालुक्यातील कल्याण (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खु., कल्याणेहोळ, भोद खु., हिंगोणे खु. आणि सतखेडा या ११ गावांना मिळणार आहे.

दरम्यान, हे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याने नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठीचे मोटारपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनीही सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना भावनिक आणि नम्र शब्दांत आवाहन करताना सांगितले की, “सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्रामीण भागात पाण्याची परिस्थिती गंभीर बनत आहे. प्रशासनाने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून हे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी सर्वांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पिण्याचे पाणी जपून, काटकसरीने आणि जबाबदारीने वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

पालकमंत्र्यांच्या तातडीच्या सूचनांमुळे प्रशासनाने जलद हालचाली करत हा निर्णय घेतल्याने पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झालेल्या ग्रामीण भागाला मोठा आधार मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा