- Ankush tv18 news – Adv. Vijay danej

धरणगाव | ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये डोळ्यांच्या आजारांबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने धरणगाव येथे ‘अनुलोम संस्था’ व ‘कांताई नेत्रालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये मोतीबिंदू तसेच डोळ्यांची सर्वसाधारण तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गरजू नागरिकांना अत्यंत अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्याची सुविधा जाहीर करण्यात आली. तसेच ‘कांताई नेत्र संजीवनी योजना’ अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
हे शिबिर सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत पार पडले. धरणगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. तपासणी दरम्यान काही रुग्णांमध्ये डोळ्यांचे गंभीर आजार निदर्शनास आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात संदर्भित (रेफर) करण्यात आले आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी ‘कृपा ॲक्वा’चे संचालक भिमराज पाटील व मनिषा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनुलोममित्र अभय मराठे, राजेंद्र पाटील, विकास पाटील यांनी धरणगाव परिसरात प्रत्यक्ष व समाज माध्यमांच्या सहाय्याने जनजागृती व प्रचारकार्य केले.
यावेळी संस्थेचे प्रतिनिधी प्रवीण दांडगे, नयना पाटील, ऋषिकेश बारी, निकिता चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





