Ankush tv1 news network
Jalgaon -Jamner

जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात आज पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया (वय ५२) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शहरात चर्चेला उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून जामनेरमधील पळसखेडा बुद्रुक शिवारात असलेल्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द करण्यात आली होती. संबंधित इमारत प्रशासनाकडून अतिक्रमणात असल्याचे नमूद करण्यात आले होते. या इमारतीचे बांधकाम उद्या (मंगळवारी) पाडण्यात येणार असल्याचे समजते.मात्र, त्याच्या एक दिवस आधीच चेअरमन कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी विषप्राशन केले असावे, अशी चर्चा असून, पोलिस तपास अद्याप सुरू आहे.कावडिया यांच्या कुटुंबीयांना ही बातमी समजताच त्यांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून किंवा कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.या घटनेनंतर शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण जामनेर तालुक्यात शोककळा पसरली असून, कावडिया यांच्या मृत्यूमागचे खरे कारण नेमके काय याबाबत जनमानसात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.





