
अकोट | रेणुका देशमुख
Ankush tv18 news network
अकोट तालुक्यातील देवरी गावामध्ये महावितरणच्या वतीने करण्यात आलेल्या विद्युत कामात गंभीर हलगर्जीपणाचा प्रकार समोर आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील मुख्य मार्गावर टाकण्यात आलेली विद्युत केबल अवघ्या सुमारे ७ फूट उंचीवर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने विद्युत केबल अत्यंत कमी उंचीवर टाकल्यामुळे ट्रॅक्टर, शेतीसाठी वापरली जाणारी वाहने तसेच मोठ्या मालवाहू वाहनांच्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. ऊस, कडबा, शेती साहित्य किंवा इतर माल वाहून नेणाऱ्या वाहनांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असून चालकांना जीव मुठीत धरून वाहने काढावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार मुडगाव फिडर अंतर्गत येत असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही केबलची उंची वाढविणे किंवा तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी या कमी उंचीवरील केबलमुळे अपघाताचा धोका अधिक वाढू शकतो. एखाद्या वाहनाचा किंवा व्यक्तीचा केबलशी संपर्क आल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केबल सुरक्षित उंचीवर स्थलांतरित करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





