अकोट | प्रतिनिधी : रेणुका देशमुख
चौहटा बाजार महसूल मंडळात भ्रष्टाचाराचा कळस? अवैध माती उत्खनन, रेती वाहतूक आणि ‘बाबूगिरी’मुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

अकोट तालुक्यातील चौहटा बाजार महसूल मंडळामध्ये भ्रष्टाचाराने अक्षरशः कळस गाठल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. अवैध माती उत्खनन, रेतीची बेकायदेशीर वाहतूक, वीटभट्ट्यांचे प्रलंबित पंचनामे आणि कार्यालयीन कारभारातील कथित अनियमितता यामुळे संपूर्ण महसूल यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन सुरू आहे. उत्खनन केलेली माती खुलेआम विक्री केली जात असल्याची चर्चा असून या व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिसरात अवैध रेती वाहतुकीलाही जणू मोकळीक मिळाल्याचे चित्र आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होत असल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनेक वीटभट्ट्यांचे पंचनामे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. तहसील कार्यालयातील एका ‘बाबू’च्या इशाऱ्यावर संपूर्ण कारभार चालत असल्याची चर्चा असून काही अधिकारीही त्याच दबावाखाली काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महसूल विभागातील अंतर्गत व्यवस्थापन आणि पारदर्शकतेबाबतही शंका उपस्थित होत आहेत.
इतकेच नव्हे तर अनेक वेळा कार्यालयीन वेळेत तलाठी कार्यालय बंद आढळत असल्याने सामान्य नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार आहे. अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी ‘महसूल मित्र’ आणि कोतवाल यांच्या खांद्यावर कार्यालयीन कारभार चालत असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी “ही प्रशासन यंत्रणा आहे की खासगी दुकान?” असा सवाल उपस्थित केला आहे. अवैध माती उत्खनन, रेती वाहतूक, प्रलंबित पंचनामे आणि महसूल कार्यालयातील कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर या प्रकरणात ठोस पावले उचलली नाहीत, तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





