जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात वाढत चाललेल्या विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांबाबत अॅड. विजय वी. दानेज (Editor, Ankush TV18 News) यांनी गंभीर स्वरूपाची लेखी तक्रार प्रशासनाकडे सादर केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनत असल्याचे नमूद करत त्यांनी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, शहरात मटका-जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामध्ये पोलिसांच्या अप्रत्यक्ष सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हातभट्टी व बेकायदेशीर दारू विक्री, काही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये विना परवानगी सेवा, तसेच गांजा, भांग व इतर अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांचा तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
वाहतूक व्यवस्थेबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले असून, शहरात सतत वाहतूक कोंडी होत असताना नियमबाह्य पद्धतीने ट्रक वाहतूक सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय वेश्याव्यवसाय, गुटखा व तंबाखूची अवैध विक्री वाढल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे.
काही ठिकाणी अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठी आर्थिक व्यवहार (हप्ते) होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याचे नमूद करत, काही पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
महिलांवरील अत्याचार, छेडछाड व बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सांगत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व प्रकारांवर भारतीय न्याय संहिता (BNS), NDPS Act, Maharashtra Prohibition Act, Gambling Act, Immoral Traffic Act, Motor Vehicles Act आणि COTPA Act अंतर्गत कारवाई होऊ शकते, असेही तक्रारीत नमूद आहे.
अॅड. दानेज यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून अवैध धंदे तात्काळ बंद करणे
- संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे
- जुगार, अमली पदार्थ, बेकायदेशीर दारू, वाहतूक नियमभंग व इतर गुन्ह्यांविरोधात विशेष मोहीम राबवणे
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे
- करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल उपलब्ध करून देणे
प्रशासनाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांमध्येही या विषयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, लवकरात लवकर ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






