Home » Shorts| ताजा खबरें # e paper » #photos story # » जळगावात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट; नागरिकांकडून संयुक्त कारवाईची मागणी ?

जळगावात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट; नागरिकांकडून संयुक्त कारवाईची मागणी ?

 ANKUSH TV18 NEWS -ADV.VIJAY B.DANEJ-

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, रिक्षा चालक, पिकअप रिक्षा तसेच चारचाकी वाहन चालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

जुने बस स्टॅण्ड ते पिंप्राळा हुडको, गोविंदा रिक्षा स्टॉप, नशिराबाद, शिरसोली, टॉवर चौक ते आव्हाने, कानळदा गाव तसेच जुने कोर्ट ते वाघनगर या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असून, चालकाजवळ तीन तर मागील बाजूस पाच असे एकूण आठ प्रवासी बसवले जात असल्याचा आरोप आहे. तर काही पिकअप रिक्षांमध्ये दहा-दहा प्रवासी वाहून नेले जात असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नियमांनुसार परवाना, बॅच-बिल्ला, फिटनेस प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असताना अनेक वाहन चालकांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी अल्पवयीन मुलांकडूनही रिक्षा चालवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड परिसर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच चारचाकी वाहने व रिक्षा उभ्या करून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “वाहतूक पोलीस कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असून मोबाईलवर सोशल मीडियात व्यस्त दिसतात,” असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाहन तपासणी मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याने बेकायदेशीर वाहतुकीला खतपाणी मिळत असल्याची चर्चा आहे.

रिक्षा भाडे आकारणीबाबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकप्रमाणे मीटरप्रमाणे भाडे आकारणी जळगावात सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या अनेक रिक्षा चालकांकडून दिवसा 40 रुपये तर रात्री 150 ते 250 रुपयेपर्यंत मनमानी भाडे आकारले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम राबवून अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, नियमभंग करणारी वाहने जप्त करावीत आणि शहरात मीटरप्रणाली लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. “कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे,” अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा