ANKUSH TV18 NEWS –
ADVOCATE -VIJAY B.DANEJ
इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ पदांसाठी ३५०० जागांची भरती; पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
जळगाव, दि. १४ मे – इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ (Home Based Caregiver) पदांसाठी तब्बल ३५०० जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून भारतातील पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आकर्षक वेतन, निवास, वैद्यकीय सुविधा आणि दीर्घकालीन रोजगाराच्या संधीमुळे ही भरती इच्छुकांसाठी मोठी सुवर्णसंधी ठरत आहे.
या भरतीमध्ये महिलांना ९० टक्के तर पुरुषांना १० टक्के संधी देण्यात येणार आहे. उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून उंची किमान १.५ मीटर व वजन किमान ४५ किलो असणे बंधनकारक आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून इंग्रजी भाषेचे मध्यम ज्ञान अपेक्षित आहे.
उमेदवारांकडे केअरगिव्हर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराने किमान ९९० तासांचा कोर्स (OJT सहित) पूर्ण केलेला असावा किंवा GDA, ANM, GNM, BSc Nursing, Post BSc Nursing, Nursing Assistant, Physiotherapy अथवा Midwifery संबंधित मान्यताप्राप्त डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. तसेच पासपोर्टची वैधता किमान ३ वर्षे असणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे १ लाख ९९ हजार ७७० रुपये वेतन मिळणार असून नियोक्त्याकडून निवास, अन्न व वैद्यकीय विम्याची सुविधा दिली जाणार आहे. उमेदवारांना आठवड्यातून ६ दिवस ‘लाईव्ह-इन केअरगिव्हर’ म्हणून काम करावे लागणार असून वृद्ध, अपंग व विशेष गरजा असलेल्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल.
कामाच्या स्वरूपात रुग्णांना आंघोळ घालणे, कपडे बदलणे, औषधे देणे, स्वयंपाक, साफसफाई, खरेदी तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मदत करणे यांचा समावेश आहे. उमेदवारांना वार्षिक १६ दिवसांची रजा व ९ धार्मिक/राष्ट्रीय सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. करार कालावधी २ वर्षांचा असून तो नूतनीकरणीय राहणार आहे.
भरती प्रक्रियेसाठी PCC (Police Clearance Certificate) सादर करणे आवश्यक असून, ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी परदेशात वास्तव्यास असलेल्या उमेदवारांसाठी Overseas PCC अनिवार्य राहील. ऑनलाइन व व्हिडिओ रेकॉर्डेड मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार असून अंतिम निवड इस्रायली नियोक्त्याकडून केली जाणार आहे. या प्रक्रियेत National Skill Development Corporation समन्वयक म्हणून कार्य करणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे पती/पत्नी, पालक किंवा मुले सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास किंवा नोकरीत नसावेत, अशी अट घालण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना नोंदणी शुल्क, वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी, व्हिसा प्रक्रिया व विमानप्रवासाचा खर्च स्वतः करावा लागणार असून प्रारंभिक खर्च सुमारे १.४७ लाख रुपयांपेक्षा अधिक असू शकतो.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी Maharashtra International या संकेतस्थळास भेट द्यावी.
जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत भेट द्यावी.





