Ankush tv18 news – (प्रेस रिपोर्टर व संपादक Adv.Vijay B.Danej )

जळगाव : शहर व जिल्ह्यात अनेक ऑटो रिक्षा चालक व मालकांकडून मोटार वाहन कायदा व परिवहन नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत अॅड. विजय बी. दानेज यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे ? .
सदर तक्रारीमध्ये रिक्षा चालकांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी जादा भाडेवसुली, बंद किंवा निष्क्रिय मीटरचा वापर, आवश्यक परवाना, फिटनेस, विमा, बॅज व इतर कागदपत्रांचा अभाव, शासन निर्धारित ड्रेस कोडचे उल्लंघन तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तन होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच वाहतूक पोलीस विभाग व RTO प्रशासनाकडून प्रभावी तपासणी व कारवाई होत नसल्याने नियमभंग करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
अॅड. विजय दानेज यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम 66, 192A, 184, 185, 194A व 177 अंतर्गत नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालक व मालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच जळगाव जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविणे, सर्व रिक्षांचे मीटर तपासणे, ड्रेस कोड व बॅज तपासणी करणे तसेच नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही अॅड. विजय बी. दानेज यांनी दिला आहे.





