कराड (प्रतिनिधी):
कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई वेताळ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अवैध धंद्यांचे “हप्ते” आणि “पॉकेट” बंद झाल्याच्या रागातूनच हा जीवघेणा खेळ रचल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप आता समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
“दराडे साहेबांचं नाव घ्यायचं नाही!” – गुंडांची थेट धमकी
अश्विनीताई वेताळ पाटील यांच्यावर हल्ला करताना गुंडांनी कोणतीही भीती न बाळगता स्पष्ट दम दिला की, “दराडे साहेबांचं नाव घ्यायचं नाही, अवैध धंद्यांवर बोलायचं नाही आणि इथून पुढे कसलेही आंदोलन करायचं नाही!”
मात्र, या दहशतीला आणि दडपशाहीला तीळमात्र न घाबरता कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच गुंडांचे हे धमकीचे शब्द जसेच्या तसे उघडे पाडले आहेत. पोलिसांच्या नाकाखाली गुंडगिरीचा हा नंगानाच सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुरावे स्पष्ट असताना १४ दिवसांची मुदत कशासाठी? पोलिसांच्या हेतूवर शंका!
या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि आरोपींना पाठीशी घालणारी दिसत असल्याचा आरोप होत आहे.
-
सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध: घटनेच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आली, सीसीटीव्ही तपासले गेले. या सर्व पुराव्यांमध्ये कार्यकर्ते स्पष्ट दिसत आहेत आणि हल्ल्याचे सर्व पुरावे समोर आहेत.
-
एफआयआर (FIR) दाखल करण्यास टाळाटाळ: एवढे स्पष्ट पुरावे असतानाही तात्काळ गुन्हा दाखल न करता पोलीस सरळ १४ दिवसांची मुदत मागत आहेत.
गंभीर सवाल: ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा हल्ला झाला, तिथले अधिकारी दराडे साहेबच आहेत. मग ते स्वतःचीच निष्पक्ष चौकशी कशी करतील? १४ दिवसांच्या या मुदतीत महत्त्वाचे पुरावे गायब करून “प्रकरणात काहीही तथ्य नाही” असा सोयीचा अहवाल तयार करण्याचे षड्यंत्र तर रचले जात नाही ना? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
“आम्ही घाबरणार नाही; हप्तेखोरांचे धंदे उघडे पाडणारच!”
महाराष्ट्रात अवैध धंद्यांविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी नेहमीच अशी षड्यंत्रे रचली जातात. परंतु, या दडपशाहीपुढे झुकणार नाही, असा ठाम निर्धार अश्विनीताई वेताळ पाटील यांनी व्यक्त केला आहे.
“यांना वाटलं आम्ही घाबरून गप्प बसू, पण आम्ही न घाबरता सर्व सत्य समोर आणले आहे. असल्या दबावाला आम्ही तीळमात्र घाबरणार नाही! हप्तेखोरांचे हे काळे धंदे उघडे पाडल्याशिवाय आणि आम्हाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच पेटत राहील!” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी होणार की हप्तेखोरांच्या दबावाखाली हे प्रकरण दडपले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



