ankush tv18 news
विशेष वृत्त | कराड

कराड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात उघडपणे अवैध मटका आणि जुगार धंदे सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कराडच्या मुख्य बस स्थानकाच्या भिंतीला लागून असलेल्या अलंकार हॉटेलच्या समोर, थेट मुख्य रस्त्यावरील टपरीमध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या (स्लिप) फाडल्या जात असल्याचे छायाचित्रे आणि व्हिडिओंमधून उघड झाले आहे.


स्थानिक नागरिकांनी आणि आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवैध धंद्यांचे सर्व पुरावे, फोटो आणि व्हिडिओ पोलीस प्रशासनाला सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती या परिसरात सातत्याने असतानाही, डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या अवैध व्यवहारांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
७ दिवसांपासून उपोषण, तरीही प्रशासन सुस्त ?
या अवैध धंद्यांच्या विरोधात आणि प्रशासकीय निष्क्रियतेच्या निषेधार्थ सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मुख्य रस्त्यावरील या टपऱ्यांमुळे गर्दुल्ले, दारूडे आणि असामाजिक घटकांचा वावर वाढला असून, सामान्य नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याचे आंदोलकांनी नमूद केले आहे.
आंदोलकांचे मुख्य मुद्दे व मागण्या:
१. अवैध खोकी व अड्डे उद्ध्वस्त करा: मुख्य बस स्थानक परिसरातील मटक्याची खोकी व सर्व अवैध धंदे तात्काळ हटवून त्यावर कारवाई करण्यात यावी.
२. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व कारवाई: तक्रार आणि पुरावे प्राप्त होऊनही कारवाई न करणाऱ्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ चौकशी करून निलंबनाची/शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी.
३. आयजीपी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा: प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले न उचलल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) कार्यालय, कोल्हापूर समोर २९ सप्टेंबरपासून तीव्र आमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या तीव्र असंतोषानंतर आता पोलीस वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन अवैध मटका अड्ड्यांवर धाड टाकतात का आणि हलगर्जीपणा करणाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे



