Ankush tv18 news netwrok
अकोट, प्रतिनिधी: निळकंठ वसू पाटील
गांधीग्राम येथील जुना पूल जीर्ण झाल्यामुळे सध्या नव्या पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे अकोट-अकोला महामार्गावरील मुख्य वाहतूक थांबवण्यात आली असून, पर्यायी मार्ग म्हणून दहीहंडा फाटा ते गोपाळखेड रस्त्याचा वापर करण्यात येत आहे.
सुरुवातीला या पर्यायी मार्गावर डांबरीकरण करून वाहतुकीस सुरळीत करण्यात आले होते, परंतु अलीकडच्या दिवसांतील मुसळधार पाऊस आणि मोठ्या वाहनांची वाढती वर्दळ यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, नागरिक, व्यापारी आणि रुग्णवाहिका चालक हैराण झाले आहेत.
अकोट येथून अकोला येथे दररोज ऍम्ब्युलन्सद्वारे रुग्ण हलवले जातात. मात्र खराब रस्त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. व्यवसायिक वाहनचालक व व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.
स्थानिक वाहन चालक उमेश बोरचाटे यांनी सांगितले की, “या रस्त्याने दररोज प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच जायचं, रस्त्याची स्थिती इतकी वाईट आहे की कधीही मोठा अपघात होऊ शकतो.”
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून जोरदार मागणी केली जात आहे की, संबंधित विभागाने तातडीने हा पर्यायी रस्ता दुरुस्त करावा. अन्यथा लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय होऊ शकतो.
तरी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम मार्गी लावावे, जेणेकरून अकोला येथे जाणारे रुग्ण, व्यापारी, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.