Please accept YouTube cookies to play this video. By accepting you will be accessing content from YouTube, a service provided by an external third party.
If you accept this notice, your choice will be saved and the page will refresh.
जळगाव/चोपडा (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कडक पाऊले उचलली असून, सातपुड्याच्या घनदाट जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजा शेतीचा अडावद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देवगड शिवारातील वनविभागाच्या क्षेत्रात चालणाऱ्या या अवैध प्रकारावर पोलिसांनी धाड टाकून १७५ गांजाची झाडे हस्तगत केली आहेत.
सोयाबीन-तुरीच्या आड गांजाची लागवड!
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या “नशामुक्त भारत” व “ड्रग्स फ्री जळगाव” या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रशांत कंडारे यांना गोपनीय बातमीदाराकडून धक्कादायक माहिती मिळाली. देवगड शिवारातील वनविभागाच्या कंपार्टमेंट क्र. १६९ मध्ये पिकांच्या आड गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाड टाकली.
तेथे पाहणी केली असता, सोयाबीन आणि तुरीच्या पिकांच्या आड लपवून पिकवलेली १७५ ओली हिरवी गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत १ किलो ३१० ग्रॅम वजनाचा आणि सुमारे २६,२०० रुपये किमतीचा गांजाचा साठा जप्त केला.
आरोपी गजाआड; NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी देवसिंग रावल्या बारेला (वय ४४, मुळ रा. सोनखेडी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश; सध्या रा. अनेर नदीच्या काठावरील झोपडी, देवगड शिवार, ता. चोपडा) याला रंगेहात अटक केली आहे.
अडावद पोलीस ठाण्यात गु.र.नं. १७८/२०२६ अन्वये NDPS Act, १९८५ चे कलम २(b), ८(b) व २०(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार सपोनि प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि प्रशांत कंडारे करत आहेत.





