Home » ताज्या बातम्या » मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष – गरजूंसाठी दिलासा देणारा उपक्रम

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष – गरजूंसाठी दिलासा देणारा उपक्रम

Trending Photos

जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परिवहन विभागाचे अधिकारी स्वस्त आणि जनता त्रस्त ? अनधिकृत टू व्हीलर विक्रेत्यांचा गोरख धंदा – गणेश कौतिकराव देंगे ची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली लेखी तक्रार

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष – गरजूंसाठी दिलासा देणारा उपक्रम


जळगाव, दिनांक 22 जुलै, 2025 ( वृत्तसेवा) : आरोग्य ही मूलभूत गरज असून अनेक वेळा गंभीर व महागड्या आजारांवर उपचार घेताना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत पुरवण्यासाठी राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही महत्त्वाची योजना राबवली जाते.

या योजनेचा उद्देश गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मादाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार मिळवून देणे, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारतसारख्या योजना उपलब्ध नसलेल्या रुग्णांनाही मदत उपलब्ध करून देणे आहे.

जळगाव जिल्ह्यात मदतीचा नवा अध्याय
जळगाव जिल्ह्यात दिनांक १ मे २०२५ पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत झाला आहे. जिल्हास्तरावर या कक्षाच्या स्थापनेमुळे आता गरजू रुग्णांना मुंबईत जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होऊन, मदतीची प्रक्रिया अधिक तातडीने आणि सुलभपणे पार पडत आहे.

या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामेश्वर नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून ही सेवा जिल्हास्तरावर आणण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच सुरू झालेल्या या उपक्रमामार्फत अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे.

यशस्वी उदाहरणे आणि दिलेली मदत
जळगाव जिल्ह्यातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सक्रियपणे कार्यरत आहे. सन २०२५ या वर्षात जानेवारी ते जून या कालावधीत कक्षामार्फत आतापर्यंत एकूण ६४७ रुग्णांना अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून विविध महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होऊन गरजूंना तत्काळ मदत करण्यात आली.

जानेवारी पासून दिलेली मदत
जानेवारी महिन्यात ₹६९ लाख, फेब्रुवारीमध्ये ₹९१.७० लाख, मार्चमध्ये ₹१ कोटी १ लाख ७५ हजार, एप्रिलमध्ये ₹९७.७० लाख, मे महिन्यात ₹८८.६५ लाख आणि जूनमध्ये ₹१ कोटी २१ लाख ६५ हजार रुपये अशा प्रकारे एकूण ₹५ कोटी ७० लाख ४५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. या निधीचा उपयोग गरीब रुग्णांच्या उपचारासाठी होत असून, त्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या कक्षामार्फत पहिल्या दोन रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र 22 मे 2025 रोजी प्रदान करण्यात आले. याअंतर्गत दिनांक १६ मे २०२५ रोजी ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचार घेत असलेले दौलत बंडू सोनवणे व न्युक्लियस हॉस्पिटल येथील रुग्ण जिजाबाई अशोक पाटील यांना उपचारासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये मदतीचे पत्र रुग्णांच्या नातेवाईकांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर व तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जात आहे. आरती स्वप्नील पाटील यांच्या नवजात बालकाच्या गंभीर आजारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ ₹५०,०००/- इतकी मदत मंजूर करण्यात आली, ज्यामुळे उपचार प्रक्रिया सुलभ झाली व बालकाच्या जीवाला दिलासा मिळाला. तसेच दिनांक ९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिरात संतोष गोविंद दांडगे यांना कर्करोगाचे निदान झाले. या गंभीर आजारासाठी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत ₹१,००,०००/- इतकी आर्थिक मदत मिळाली, ज्यामुळे त्यांच्या उपचारांचा मार्ग मोकळा झाला. वरखेडी (ता. पाचोरा) येथील गणेश पूनमचंद कुमार यांच्या अवघ्या सहा दिवसांच्या बालकास ऑक्सिजनची कमतरता व श्वसनास अडचण निर्माण झाल्याने तसेच हातासंबंधित गंभीर समस्या निर्माण झाल्याने त्यांना निधीतून ₹५०,०००/- ची तातडीची मदत दिली गेली. यामुळे वेळेत उपचार होऊन नवजात शिशूची प्रकृती सुधारण्यास मदत झाली. अशा प्रकारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीने वेळेवर दिलेल्या मदतीमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले असून, ही योजना गरजूंसाठी एक महत्त्वाचा आधार ठरत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपक्रम म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर गरजू रुग्णांना दिलासा देणारी एक माणुसकीची चळवळ आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू झालेला हा उपक्रम अनेकांच्या जिवनात नवा आशेचा किरण घेऊन आला आहे. जिल्हास्तरावर मिळणाऱ्या तातडीच्या मदतीमुळे रुग्णांच्या जीवनातील अडथळे दूर होत असून, या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजूंना मिळावा, हीच अपेक्षा.

मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबीर – एक उपयुक्त उपक्रम
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे दिनांक ९ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि गरजूंना पुढील उपचारासाठी मदतीसाठी जोडले गेले.

या योजनेअंतर्गत मदत मिळवण्यासाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी खालील ठिकाणी संपर्क साधता येईल:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
संपर्क क्रमांक: 9309844510
ई-मेल: jalgaoncmrf@gmail.com

बातमी शेअर करने करिता क्लिक करा

Author Box

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

advertisment

अंकुश टीव्ही 18 न्यूज चॅनल यूट्यूब ला LIKE ,SHARE AND SUBCRIBE करा