अखेर कोथरूडच्या ‘त्या’ पीडित मुलींच्या लढ्याला यश; न्यायालयाच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस दलासह कोथरूड ठाण्याच्या सहा पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल
Ankush tv18 news network

पुणे: छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांसह कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून चौकशी करताना मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप मुलींनी केला. यामुळे शहरात संतापाची लाट उसळली. पीडितांसह त्यांच्या मदतीसाठी आलेल्यांनी रात्रभर पुणे पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला, तरीही न्याय मिळाला नाही. याउलट सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनीच मुलींवर नोंदविला. याविरोधात पीडितांनी न्यायालयात धाव घेतली आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळाले. न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी (दि. १५) सहा पोलिसांसह आठ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता आरोपी पोलिसच गजाआड जाण्याची शक्यता आहे.
कोथरूड पोलिस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल कामठे, पोलिस कर्मचारी संजीवनी शिंदे, सायबर विभागाचे पोलिस अधिकारी धनंजय सानप, पोलिस कर्मचारी विनोद परदेशी, कोथरूड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलिस शिपाई श्रुती कढणे, छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त पोलिस कर्मचारी सखाराम सानप आणि एपीआय प्रेमा पाटील यांची एक मैत्रीण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाचा निष्कर्ष
एपीआय प्रेमा पाटील यांच्या वकिलांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. त्यानंतर गुन्हा घडल्यासारखे प्रथम दर्शनी दिसत असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार सहा पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलींना या लढ्यात साथ देणारे वकील व कार्यकर्ते शनिवारी सकाळी कोथरूड पोलिस ठाण्यात उपस्थित होते.
रूपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करा…
पीडितेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार करत मदत मागितली होती. परंतु रूपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली. पोस्टमध्ये पीडितेचे नाव टाकले होते. विनयभंग व अॅट्रॉसिटी असल्याने पीडितेने फोन व मेलद्वारे ती पोस्ट डिलीट करा, माझी बदनामी होत आहे, असे सांगितले. मात्र, तरीही चाकणकर यांनी पोस्ट डीलिट केली नाही. याबाबत पीडितेचे वकील अॅड, परिक्रमा खोत, अॅड. अरविंद तायडे, अॅड. भाऊसाहेब आजबे, अॅड, रेखा चौरे आणि श्वेता पाटील यांनी चाकणकर यांच्या विरोधात बीएनएस कलम ३५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगितले.
संबंधितांना बडतर्फ करा…
दि. ३ ऑगस्टला पीडितांवर जो अन्याय झाला आहे, त्याची एफआयआर दाखल करा अशी आमची मागणी होती. सकाळी साडेदहा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत आम्ही पोलिस आयुक्तालयात बसलो. त्यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल न करता कार्यकर्त्यांवर वकील मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आम्ही अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात दावा दाखल केला. आता संबंधितांवर गुन्हा दाखल झाला असून या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे अॅड. अरविंद तायडे यांनी सांगितले.
आरोपींना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार…
दि. २ ऑगस्ट रोजी आम्ही कोथरूड पोलिस ठाण्यात जात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस आयुक्तालयातदेखील आम्ही हीच मागणी घेऊन गेलो होतो. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला ही घटना पब्लिक व्हा मध्ये घडलेली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही, असे मध्यरात्री लिहून दिले होते. न्यायालयाने आमचे संपूर्ण म्हणणे व पुराव्यांच्या आधारे ११ नोव्हेंबरला संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात जरी धाव घेतली तरी आम्ही त्यांना जामीन मिळू नये यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे अॅड, परिक्रमा खोत यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
कोथरूडमधील तीन मुलींसोबत पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवरच गुन्हा दाखल केला. पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करून पोलिसांवर कारवाईची मागणी केली. न्यायालयाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे व या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते.
आमच्यावर जो अन्याय झाला आहे, त्याचा न्याय मागण्यासाठी आम्ही पोलिस ठाणे व आयुक्तालयात गेलो पण आमच्यावरच गुन्हा दाखल केला. आमची साधी एफआयआर नोंदवून घेतली जात नव्हती, पण न्यायालयाच्या आदेशामुळे आज अखेर एफआयआर दाखल झाला. आमच्या लढ्याला ५० टक्के यश मिळाले आहे. पुढे अजून लढायचे आहे.
पीडित मुलगी न्यायालयाचा आदेश… संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी याचिकेत केली होती. यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी ओळख सांगितली नाही. त्यांनी मुर्तीची तपासणी करून त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला, असे कोर्टाने म्हटले आहे. संबंधितांवर बीएनएस कलम ३१०(२), १४०(३), ७४, ३३३, ६२, ११५(२), ३५२, ३५१ (३), ३(५) यांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अन्वये ३ (१) (г), ३(१)(s), ३(१) (w) (i), ३(१) (w) (II) नुसार गुन्हा नोंदवला.





