Ankush tv18 news network
दारूबंदी विभाग नावालाच; अकोट उपविभागात देशीदारू वाहतुकीला ऊत!
दहीहांडा पोलिसांची कारवाई — ₹४०,६०० रुपयांची दारू जप्त; पोलीस प्रशासनाची वाढली डोकेदुखी
प्रतिनिधी : अकोट

अकोट उपविभागात अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री दिवसेंदिवस वाढत असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गावागावात दुचाकी वाहनांद्वारे थेट दारू पोहोचवली जात असून, हा सर्व व्यवहार दारूबंदी विभागाच्या “आशीर्वादाने” सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
दारूबंदी विभागावर नागरिकांचा विश्वास उडाला असून, ते आता विभागाला “रंद्दी विभाग” या नावाने हिणवू लागले आहेत. परवानाधारक दुकानदारांकडे बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ कागदोपत्री ठरत आहेत. गावोगावी पेट्यांच्या पेट्या दारू वाहतूक होत असताना, अकोला दारूबंदी विभाग मात्र *“मिस्टर इंडिया”*प्रमाणे गायब असल्याची चर्चा जनतेत जोर धरत आहे.
तक्रारी आल्यानंतरही विभागाकडून केवळ नावालाच कारवाया होत आहेत. उलटपक्षी, परवानाधारक दुकानदारांना संरक्षण देण्याचे प्रकार वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर अनावश्यक दबाव निर्माण होत असून, सामान्य नागरिक आणि महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आचारसंहिता लागू असताना पोलीस कर्मचारी बंदोबस्त, तंटे निवारण आणि गुन्हे तपास अशा जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे दारूबंदी विभागाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
दहीहांडा पोलिसांची कारवाई : ₹४०,६०० चा मुद्देमाल जप्त
अवैध दारूविरुद्ध “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत दहीहांडा पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ₹४०,६०० किमतीचा दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
दारू जप्त व्यक्ती व तपशील :
शंकर भाऊराव सपकाळ (वय ३९, किनखेड) — १११ बाटल्या (किंमत ₹१०,०००)
बंडु मारोती बगाडे (वय ४२, कावसा) — २७ लिटर हातभट्टी दारू (₹६,९५०)
सुवर्णा राजु राऊत (वय ३३, पुंडा) — १०० बाटल्या (₹४,५००)
दिपक दामोधर माळी (वय ५३, कीनखेड पूर्णा) — १०६ बाटल्या (₹५,३००)
कुलदीप सतीश पेठे (वय २२, कीनखेड पूर्णा) — १०५ सीलबंद बाटल्या (₹१०,२५०) एकूण ₹४०,६०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल ढोले आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
ठाणेदार गोपाल ढोले यांचे आवाहन -“नागरिकांच्या वाढत्या तक्रारींवरून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत. पुढेही अशाच प्रकारे अवैध दारूविरुद्ध सतत कारवायांचा सपाटा राहील. दहीहांडा हद्दीत शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन ठाणेदार गोपाल ढोले यांनी केले.
प्रतिक्रिया — गणेश बोरचाटे, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी सर्कल अध्यक्ष यांनी सांगितले,
“कुटासा, पुंडा, करतवाडी, किनखेड पूर्णा आदी गावांमध्ये दुचाकीवरून दिवसाढवळ्या दारू वाहतूक होते. या अवैध व्यवहारांना आळा बसला नाही, तर याची सर्वस्वी जबाबदारी अकोला दारूबंदी विभागावर राहील. पोलिसांनी कारवाई तीव्र करावी आणि दोषींना कायमचा धडा शिकवावा.”
संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, दारूबंदी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने अशीच धडक कारवाई कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





