Ankush tv18 news network
SOLAPUR –
कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत सोलापुरातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा माजी कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय 34, रा. मंद्रूप, द. सोलापूर) याचा धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला. तसंच त्याच्यासोबत असेलली महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर (वय 32 रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या भयंकर घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडालेली असताना सोलापूरमधील अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला आहे. कारण राजकीय नेत्यापेक्षा अनमोल केवटे याच्या नावाची मंद्रूप परिसरात मोठी दहशत होती. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लेटर पॅडवर त्याने शिक्षण संस्था, शिक्षक, शासकीय कर्मचारी, पोलिस यांच्याविरोधात शेकडो तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारींचा तो पाठपुरावाही करत असायचा. केवटे यांच्या वर्तनामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात धडकी भरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल केवटेचा खून बुधवारी मध्यरात्रीनंतर 12.45 वाजता खाडगाव रोड, लातूर येथे झाला. मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे दोघे बुधवारी अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते. सोनाली भोसले यांच्यासोबत अनमोल यांचं बोलणं झालं आणि सोनाली यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले होते. गाडीला कट लागल्याच्या कारणावरून क्रूझर चालकात आणि अनमोल केवटे या दोघांत वादविवाद झाला होता. यावरून क्रूझर चालकाने अनमोल केवटेचा गळा चिरला आणि सोनाली भोसलेला पाठीत पोटात भोकसले. सोनाली भोसले यांच्यावर आता लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.