जळगाव, दिनांक १७ सप्टेंबर (Ankush tv18 news network ) :
महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ घ्यावा: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्यविषयक विविध योजनांचा लाभ घेऊन आपले आरोग्य जपावे. असे आवाहन, केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे,यांनी केले.
केंद्र सरकारच्या ‘स्वस्थ नारी’ – ‘सशक्त परिवार’ या अभियाना निमित्त जळगाव जिल्हा रुग्णालय, येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्रीमती खडसे बोलत होत्या. कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख उपस्थितीत मध्य प्रदेशातील धार जिल्हयात आयोजित “स्वस्थ नारी’-‘सशक्त परिवार” अभियान’ शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. या प्रसंगी खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती खडसे आपल्या मनोगतात म्हणाल्या, महिलांनी आरोग्य विषयक शासकीय योजनांचा लाभ घेऊन नियमित आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. कुटुंबातील महिला स्वस्थ असेल तर संपूर्ण कुटुंब सशक्त राहू शकते. महिलांनी आपल्या नियमित आहाराकडे लक्ष देऊन आपले आरोग्य चांगले ठेवावे, आरोग्याची काळजी घ्यावी.’सेवा पंधरवाडा’ हा उपक्रम सर्व शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने राबविला जात आहे या उपक्रमा निमित्त, विविध शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून, लोकसहभाग वाढवून लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणांतर्फे प्रयत्न झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या परिसरात उभारण्यात आलेल्या आरोग्य विषयक योजनांची माहिती देणा-या विविध स्टॉलला राज्यमंत्री यांनी भेट दिली व माहिती जाणुन घेतली.
शासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सेवा पंधरवड्यात ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ व ‘नमो नेत्र संजीवनी’ या सेवा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय संस्थांमध्ये वैद्यकीय तपासणी व उपचार मोहिमा राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत एकूण २,०९९ शिबिरे आयोजित करण्यात येणार असून महिला आरोग्य तपासणी, एनसीडी स्क्रीनिंग, क्षयरोग तपासणी, अॅनिमिया व सिकलसेल तपासणी, लसीकरण सेवा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आहारविषयक जनजागृती, संसर्गजन्य रोग नियंत्रण, रक्तदान शिबिरे तसेच आयुष्मान भारत कार्ड व आभा कार्ड वितरण या सेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. सेवा पंधरावाड्या निमित्त आयोजित शिबिरात स्क्रीनिंग झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया अथवा रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता भासल्यास, त्यांचे मोफत उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत खासगी रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केले जाणार आहेत. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण करण्यात आले.
या अभियानात ऑर्किड मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वनिता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल, जळगाव यांनी सहभाग नोंदविला. तसेच राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान, राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप कार्यक्रम व मुख्यमंत्री सहाय्यता निधी याबाबत जनजागृतीसाठी माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांना ‘निक्षय मित्र’ म्हणून गौरविण्यात आले. तसेच इतर निक्षय मित्र यांनाही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी नागरिकांना गोल्डन कार्ड वाटपही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका, शासकीय रुग्णालय व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आभार व्यक्त केले.