Ankush tv18 news network
जळगाव, दिनांक 26 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर
असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार
करून तात्काळ पूर्ण करावीत असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री
तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महावितरण
कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली
झाली. त्यावेळी ते बोलत होते.या बैठकीला आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील,आमदार अमोल जावळे आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते
आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनेतंर्गत जिल्ह्यातीलमंजूर कामांना महावितरण कडून गती मिळणे आवश्यक असून यासाठी संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. जिल्ह्यातील कृषी व महावितरण विभागाच्या आढावा बैठकीत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे, अपूर्ण पंचनामे तातडीने संपवण्याचे व पीएम किसान प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. सौर ऊर्जा प्रकल्प, पीएम-कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना गतीने राबवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, नादुरुस्त रोहित्रे व खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा नियमीत करावा, असे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून पारदर्शक बिलिंग व विजेची बचत याबाबत माहिती गावागावांत पोहोचवावी, असेही ते म्हणाले.
ग्रामीण भागात वायरमन गावात वास्तव्यास नसल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असून त्याबाबत कठोर भूमिका घेऊन संबंधितांना नोटीस देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तारांची चोरी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
दिले. या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार अमोल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. त्यावर महावितरणकडून सकारात्मक
उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, प्रत्येक तालुक्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे पूर्ण करावीत, जल जीवन मिशन साठी वीजपुरवठा सुरू ठेवावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी यांनी यावेळी महावितरण व कृषी
विभागाच्या सध्या स्थितीच्या सुरू असलेल्या कामकाजा संदर्भात सादरीकरण केले. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ अंतर्गत चोपडा येथील पर्यावरणपूरक मानाचा गणपती या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या
हस्ते चोपडा नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या ‘महाविस्तार, शेतकऱ्याचा डिजिटल मित्र या AI ॲपचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.