जळगाव :
जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर काही टू व्हीलर खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी सार्वजनिक रस्त्यावरच गाड्या उभ्या करून विक्री सुरू ठेवली आहे. या बेकायदेशीर वाहन उभे केल्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


या परिसरात दिवसभर मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते. तरीदेखील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विक्रीसाठी दुचाकी उभ्या करण्यात आल्याने वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण झाले आहे. शाळा-कॉलेज जाणारे विद्यार्थी, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांना याचा विशेष त्रास होत आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप या बेकायदेशीर वाहनविक्रीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, एजंटांचे मनोबल वाढले असून सार्वजनिक रस्ता व्यापून त्यांनी आपले दुकानच उघडले आहे, अशी नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ कारवाई करून मुख्य रस्ता मोकळा करावा आणि बेकायदेशीर वाहनविक्री थांबवावी, अशी मागणी केली आहे.