
ANKUSH TV18 NEWS NETWORK
नागपूर : अल्पवयीन मुलाला दुचाकी चालविण्यासाठी दिल्यामुळे दुचाकी नावावर असलेल्या महिलेला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ३२ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. तसेच वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाच्या २५ वर्षापर्यंत वाहन चालविण्यावर बंदी घातली.
१६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर ट्रिपलसीट समोसा खाण्यासाठी जात होता. सावरकरनगर चौकात सोनेगाव वाहतूक पोलिसांनी त्याला अडवून वाहनाचे कागदपत्र मागितले. परंतु, त्याच्याकडे कुठलाही वाहन परवाना आढळला नाही.
चौकशीत वाहन सोबत असलेल्या मित्राच्या आईच्या नावाने असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी मोटर वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलगा आणि वाहन नावावर असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या प्रकरणावर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमक्ष (मोटर वाहन) सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे आणि पुरावे लक्षात घेत अल्पवयीन मुलगा आणि त्याला वाहन चालविण्यासाठी दिल्यामुळे त्याच्या मित्राच्या आईला दोषी ठरविले. कायद्यातील तरतुदीनुसार अल्पवयीन मुलाला २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्यास बंदी घालून वाहन नावावर असलेल्या महिलेला विविध कलमांनुसार ३२ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. न्यायाधीश एम. डी. बिरहारी यांनी हा निर्णय दिला.





