महेंद्र कुंभारे, भिवंडी.
रविवार दि. 31 ऑगस्ट 2025
एकीकडे जनता आनंदाने विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने हर्षोल्लासीत झालेली असताना राज्य सरकारने एक फार मोठे विघ्न जनतेच्या दारात आणून ठेवले आहे. हे विघ्न बुध्दीची देवता श्री गणेश कसे परतावून लावते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नुकतेच सरकारने सर्व जिल्हापरिषदांना आदेश दिले आहेत की, ग्रामपंचायतींच्या अधिकार क्षेत्रात स्मार्ट मिटरची अंमलबजावणीची कार्यवाही करावी. त्यामुळे जनता गणेशोत्सवात मग्न असताना, विघ्नहर्ता घरात असतानाच विघ्न दारात येऊन उभे राहीले आहे. स्मार्ट मिटर बाबत अनेक धक्कादायक निष्कर्ष निघाले असतानाही केंद्र सरकारचा लाडका असलेल्या “अदानी” चा व्यापार व्हावा म्हणून सक्तीने जनतेवर स्मार्ट मिटर बसविणे बंधनकारक केले जात आहे.
राज्यात 2 कोटी 42 लाख स्मार्ट मीटर्स बसविण्यात येणार आहेत. यासाठी 27 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकार दोन हजार कोटींचे अनुदान देणार आहे. एका मीटर साठी सरासरी रु.12000/- बारा हजार खर्च अपेक्षित आहे. केंद्राकडून फक्त रु. 900 प्रत्येक मीटर साठी मिळणार आहेत. उर्वरित रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जाणार आहे. शिवाय या स्मार्ट मिटर्सना मोबाईल सारखे आधीच रिचार्ज करावे लागणार आहे. रिचार्ज संपला की तुमची लाईट बंद होणार आहे. तसेच हे स्मार्ट मीटर्स खुपच फास्ट चालत असल्याचे गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड येथील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिथे स्मार्ट मीटर विरोधात आंदोलने सुरु आहेत.
विज कायदा अधिनियम 2003 च्या कलम 47 नियम 5 नुसार मीटर बाबतचे कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार ग्राहकाचा आहे. त्यामुळे ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविता येणार नाही. तरीही महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने अदानीचा फायदा व्हावा याकरिता जा.क्र. व्हीपीएम. 2025/प्र.क्र.178/पं रा-37/ दि. 25/08/2025 रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या अधिकारक्षेत्रात स्मार्ट मिटरची अंमलबजावणीची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जनता विघ्नहर्ता गणेशाच्या उत्सवात मग्न असताना मोठे विघ्न जनतेच्या दारात येऊन उभे राहीले आहे. तरीही जनता आपल्या अधिकाराबात झोपलेली असल्यामुळे येत्या काळात प्रत्येकाच्या दारात स्मार्ट मीटर लावल्यानंतर भल्या मोठ्या रक्कमेचे वीज बील हातात पडेल तेंव्हाच सगळ्यांचे डोळे उघडतील.