Ankush tv18 news network
मुंबई : मुंबईतील व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात घडलेल्या PSI च्या अरेरावीची प्रकाराने संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा धोक्यात आली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) दुर्गा खर्डे यांनी तक्रारदार महिलेवर संतापाच्या भरात स्वत:ची ‘नेमप्लेट’ आणि ‘बॅच’ फेकून मारल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित अधिकारी यांच्यासह मुंबई पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी खर्डे यांना १८ नोव्हेंबरपर्यंत लिखित उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि परिमंडळ-२ चे उपायुक्त यांनाही नोटीस पाठवून सहा आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
ही कारवाई अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे यांनी संबंधित व्हिडीओ व छायाचित्रांसह आयोगाकडे दिलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. आयोगाने सोशल मीडियावरील व्हिडीओ, वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि प्राप्त झालेली तक्रार यांचा तपास करून तत्काळ सुनावणीस सुरुवात केली.
तक्रारदार महिलेचे म्हणणे असे आहे की, ती आपली तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती; मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. याबाबत जबाब विचारल्यावर खर्डे आक्रमक झाल्या आणि त्यानंतर त्यांनी तक्रारदार महिलेच्या अंगावर नावाची प्लेट व बॅच फेकली.
या प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा कलंकित होत असल्याची टीका होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कडक कारवाई करावी व सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी कोठावदे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.