नवी दिल्ली: अमेरिकेने केलेल्या आयात शुल्कातील तीव्र वाढीच्या परिणामांना झुगारून देत, एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने अनपेक्षितपणे मजबूत वाढीची नोंद केली. शुक्रवारी जाहीर अधिकृत आकडेवारीनुसार, भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादनांत (जीडीपी) तिमाहीत ७.८ टक्के दराने वाढ नोंदविली गेली, जी आधीच्या पाच तिमाहीतील सर्वोच्च वाढ आहे. रिझर्व्ह बँकेने ऑगस्टच्या सुरुवातीला अंदाजलेल्या ६.५ टक्क्यांपेक्षाही सरस असा हा वाढीचा दर आहे.
आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने, जानेवारी ते मार्च २०२५ या आधीच्या तिमाही कालावधीत ७.४ टक्के वाढ साधली होती. ताजा ७.८ टक्क्यांचा वाढीचा दर पाहता, भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था ठरली असून, तिने चीन व अमेरिकेपेक्षाही सरस वाढीचा दर नोंदविला आहे. चीनची अर्थव्यवस्थेने एप्रिल-जून तिमाहीत ५.२ टक्क्यांच्या वाढीचा दर नोंदविला आहे. २०२३ – २४ आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत, म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये अर्थव्यवस्थेने ८.४ टक्के असा यापूर्वीचा सर्वोच्च वाढीचा दर नोंदविला आहे.
