Ankush tv18 news network
जळगाव : लाचेविषयी तक्रार करायची झाल्यास जळगाव शहर लांब पडते म्हणून कंटाळा न करता केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात दूरध्वनी, मोबाइलद्वारे संपर्क साधून माहिती दिली तर ‘एसीबी’ संबंधित ठिकाणी पोहोचणार आहे.
लाच तर घ्यायची, मात्र अंगावर आले तर तो मी नव्हेच, अशी भूमिका घेण्याकडे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तींचाही वापर होऊ लागला आहे. पैशाशिवाय काम करायचे नाही ही मानसिकता जनतेसाठी डोकेदुखी व खर्चिक ठरत असल्याने याविषयी तक्रार करणे आवश्यक आहे. तशा तक्रारी होतातही, मात्र जळगाव जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहिली तर चाळीसगाव, अमळनेर, पारोळा या तालुक्यांना जळगाव शहरापेक्षा धुळे शहर जवळ पडते. त्यामुळे या तालुक्यातील अनेक तक्रारदार जळगाव येथे न येता धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात. परिणामी तेथील पथक जळगाव जिल्ह्यात कारवाई करते. अशाच प्रकारे रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यातील मंडळीही जळगाव शहर लांब पडते म्हणून तक्रारीविषयी कंटाळा करतात.
चाळीसगाव तालुका १०० कि.मी. अंतरावर येतो, तर दुसरीकडे मुक्ताईनगर, रावेर हा भागही लांब पडतो. अंतर जास्त असल्याने तक्रारीविषयी कंटाळा होत असल्याचे लक्षात आल्याने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी थेट तक्रारदारांपर्यंतच टीम पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लाचेविषयी तक्रार करायची असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात केवळ संपर्क साधला तरी तेथे पुढील कार्यवाही होणार आहे.लाचेविषयी तक्रार झाल्यानंतर रक्कम स्वीकारताना लाचखोरावर कारवाई होते. त्यामुळे रोख रक्कम न घेता काही जण वस्तूंचीही मागणी करतात. त्याविषयी तक्रार करता येऊ शकते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे लागत असल्यास त्यासाठीही पैशाची मागणी करीत विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असल्याचा अनुभवदेखील येत आहे. मात्र, अनेक प्रकरणांत कोणी लाच मागितली तर त्याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करू, असे विद्यार्थ्यांनी सांगताच त्यांचे काम करून देण्यात आल्याचेही प्रकार घडले.