ANKUSH TV18 NEWS NETWORK
जळगाव, : शहरातील गांधी मार्केटशेजारील पे अॅन्ड पार्कच्या जागेत बेकादेशीररीत्या चालविला जाणार आनंद मेळा अखेर शहर पोलिसांनी बुधवारी (ता. ३) रात्री साडेआठला बंद पाडला. महापालिका आयुक्त, उपायुक्त, मालमत्ता कर अधीक्षक, वीज विभागाने या बेकादेशीर कृत्याला ‘बॅकडेटेड’ मंजुरी देण्याचा घाट घातला. मात्र, महापालिकेव्यतिरिक्त पोलिस, महावितरण, मनोरंजन विभाग यांच्या परवानग्या नसल्याचा आधार घेत पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या पथकाने रात्री कारवाई केली आहे.
शहरात गणेशोत्सव सुरू आहे. भाविकांची गर्दी रस्त्यांवर मावत नसताना गांधी मार्केटशेजारील पे-अॅण्ड पार्कची जागा बेकादेशीरपणे आनंद मेळ्याला दिली जाते. प्रकरण बातमी स्वरुपात १ सप्टेंबरला समोर आल्यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त धनश्री शिंदे यांनी याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सुरवातीला सांगितले. मिळकत व्यवस्थापक गौरव सपकाळे यांनी या प्रकरणात पहिल्यांदा २ हजार रुपये रोज आकारण्यात आल्याचे अधिकृतरित्या सांगितले. मात्र, मेळा चालवण्याचा संपूर्ण प्रकार हा बेकादेशीर, विना परवानगी आणि धोकेदायक, असुरक्षितपणे चालवला जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर अधिकाऱ्यांची झोपमोड झाली.
पे-अॅण्ड पार्कच्या जागी २५ ऑगस्टपासून आनंद मेळा सुरू आहे. याबाबत ‘सकाळ’ने रविवारी (ता.३१) पार्किंग अभावी गणेशभक्तांची गैरसोय म्हणून वृत्तांकन केले. बातमी प्रसिद्ध झाल्यावर हा मेळा संपूर्णतः बेकादेशीरविना परवानगी आणि धोकेदायक पद्धतीने सुरू असल्याचा उलगडा झाला. याबाबत मंगळवारी (ता.२) आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी ‘लाईव्ह कॅमेरा’ देखत परवानगी आम्ही दिली नसल्याचे सांगितले. असे असताना उपायुक्त धनश्री शिदि यांच्याकडून बँकडेटेड १ सप्टेंबरच्या परवानगीचे पत्र काढण्यात आले. मेळ्यासाठी केवळ महापालिकाच नाही तर पोलिस, महावितरण, महसूलचा मनोरंजन विभाग आणि अग्निश्यामकची परवानगी देखील आवश्यक असते. याचा विसर कदाचित आयुक्त, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना पडला असावा, एक परवानगी ‘बँकडेटेड’ मिळवता येईल. मात्र, इतर परवानग्या कशा मिळतील, येथेच घोडे अडले.
मग पोलिस का कारवाई करीत नाही म्हणून विचारणा केल्यावर पथक कारवाईला गेले. त्यांना महापालिकेची परवानगी असल्याचे पत्र संबंधितांनी दाखविल्याने पोलिसही परतले. मात्र, या आनंद मेळ्याला पोलिसांच्या गोपनीय विभागाची परवानगी आवश्यक असते. अग्निशामक दलाची परवानगी हवी असते, याची जाणीव करून दिल्यावर बुधवारी (ता.३) रात्री साडेआठला शहर पोलिसांनी हा मेळा सुरक्षेच्या आणि पोलिस परवानगीच्या कारणाने बंद केला.
नियमानुसार महापालिका, महावितरण आणि अग्निश्यामक दलासह शहर पोलिसांची देखील परवानगी अपेक्षित आहे. इतर कुठल्याही परवानग्या संबंधितांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे तो आनंद मेळा बुधवारपासून बंद आहे. केवळ उपायुक्तांच्या सहीचे पत्र असून, कायदेशीर परवानग्या, ना-हरकत आणि सोबतच सुरक्षा उपाययोजना हव्यात. सर्व बाबींची पूर्तता करण्याच्या आपण सूचना संबंधिताना दिल्या आहेत.