ऐतिहासिक निर्णय : गणेशोत्सवामुळे ईद-ए-मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे, अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचा अनोखा संदेश
अकोला – धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकतेचा अनोखा संदेश देत अकोला शहरात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे मुस्लिम समाजाने स्वखुशीने ईद-ए-मिलादची मिरवणूक तीन दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी आणि मंडळांनी एकत्रित बैठक घेऊन हा निर्णय घेतला असून, गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी घेतली आहे. यामुळे शहरात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचं आणि परस्पर आदराचं दर्शन घडत आहे.
शहरातील प्रमुख मंडळांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “धर्म साजरा करताना एकमेकांच्या श्रद्धांचा मान राखणे ही आपली जबाबदारी आहे. एकोपा टिकवून ठेवणे हेच आपल्या शहराचे वैशिष्ट्य आहे.”
स्थानिक प्रशासन आणि पोलीस दलाने या निर्णयाचे स्वागत केले असून, शहरवासीयांनीही दोन्ही समाजांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले आहे.