जळगाव पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी भव्य जनजागृती रॅलीला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जळगाव : शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या दृढ निश्चयाने, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतुन, जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे १५ ऑगस्ट २०२५ रोजी एका भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या रॅलीला शहरातील नागरीक, विद्यार्थी आणि सामाजीक कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या जनजागृती रॅलीचे उद्घाटन जी.एस. ग्राऊंड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले. या प्रसंगी मा. श्रीमती स्मिताताई वाघ, लोकसभा सदस्य, जळगाव शहराचे आमदार श्री. सुरेश दामु भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक नखाते यांच्यासह पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. सदरची रॅलीची सुरुवात शहरातील जी.एस. ग्राऊंड येथुन होवुन शेवट महात्मा गांधी उद्यान येथे झाला. ही रॅली जी.एस. ग्राऊंड, बेंडाळे कॉलेज, पोलीस अधीक्षक कार्यालय, स्वातंत्र्य चौक येथील महात्मा गांधी उद्यान अशा प्रमुख मार्गावरुन फिरुन जनजागृतीचा संदेश देत होती. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या जळगाव शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदीर, जळगाव येथील श्री. योगेश भालेराव यांचे लेझीम पथक, श्री. चिन्मन नाझरकर यांचे शौर्यवीर ढोलपथक, पोलीस स्पोर्ट अॅकेडमीतील कराटे खेळाडु तसेच एम.जे. कॉलेज, नुतन मराठा महाविद्यालय, नंदीनीबाई महाविद्यालय, ए.टी. झांबरे विद्यालय, पलोड इंग्लिश मिडीयम स्कुल येथील NCC, RSP विद्यार्थी / विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवुन हातात फलक आणि बॅनर घेवुन व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या. ज्यामुळे संपुर्ण वातावरण उत्साहाने भारले गेले होते. रॅलीचा समारोप महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आला असुन सदर ठिकाणी श्री. संग्राम जोशी व त्यांचे सहकारी यांनी पोवाळ्याचे सादरीकरण करुन जनजागृती केली. तसेच समाजकार्य विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील श्री. योगेश माळी व त्यांचे पथनाट्य संघ यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पथनाट्यचा प्रयोग सादर केला. शहरातील ९८.३ FM तडका आर. जे. समृध्दी व सहकारी श्री अक्षय नेहे यांनीही या मोहिमेला पाठिंबा देत जनजागृती केली.
तसेच मा.डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे संकल्पनेतुन चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव येथे श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमादरम्यान नागरीकांना मार्गदर्शन केले.
सदर जनजागृती रॅलीचे संपुर्ण नियोजन पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले असुन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. राहुल गायकवाड, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. पवन देसले, मानव संसाधन विभागाचे पोलीस निरीक्षक, श्री. संदिप पाटील आणि AHTU च्या सहा. पोलीस निरीक्षक, श्रीमती योगिता नारखेडे यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. जळगाव पोलीस दल शहराला व्यसनमुक्त वनवण्यासाठी कटीबध्द असुन यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले.