Ankush tv18 news network

Mumbai- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकार तातडीच्या मदतीसाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. घरे, शेती आणि पशूधनाचे नुकसान झालेल्या भागांत नुकसान भरपाईचे निकष शिथिल करून मदत दिली जाईल.
आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना ₹2215 कोटींची मदत मंजूर झाली असून, त्यापैकी ₹1829 कोटी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले आहेत. पुढील 8 ते 10 दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल. पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच, तातडीने आर्थिक सहाय्य दिले जात असून, निधीची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे जीआर काढण्यात येत आहेत. मदतकार्य कुठेही थांबलेले नसून, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्य करत आहेत. तसेच स्थलांतरितांसाठी अन्न, पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली आहे. धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले असून, या भागात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या 17 तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. पण राज्याने तातडीने मदत देणे प्रारंभ केले आहे. हवामान खात्याने 27 आणि 28 सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून, प्रशासन यादृष्टीने सज्ज आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरस्थितीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.