स्मार्ट मीटर विरोधात ग्रामस्थांचा सूर, जुने मीटर पुनर्स्थापनेची मागणी
लक्ष्मीकांत कौठकर यांच्या अध्यक्षतेखालील चर्चासत्रात शेतकरी–शेतमजुरांची तीव्र नाराजी • गरज भासल्यास आंदोलनाचा इशारा
Ankush tv18news network\
अकोट – अकोट व तेल्हारा तालुक्यातील वीज ग्राहकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने बसवलेल्या स्मार्ट मीटरांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर २०२५) रोजी अकोट तालुक्यातील शितामाता पुरा, अडगाव बु. येथील लक्ष्मीकांत कौठकर यांच्या निवासस्थानी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात शेती करणारे शेतकरी, शेतमजूर, वीज ग्राहक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकमताने असे मत मांडले की, स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मोठी वाढ होत असून, हे मीटर अव्यवहार्य, अयोग्य आणि त्रासदायक ठरत आहेत. बैठकीत बोलताना शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी सांगितले की, “जर वीज वितरण कंपनीने ग्राहकांची ही योग्य मागणी मान्य केली नाही, तर गरज भासल्यास शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक यांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडले जाईल.” ते पुढे म्हणाले की, “स्मार्ट मीटरांमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि तांत्रिक बिघाडांमुळे ग्रामस्थांचा संयम सुटू लागला आहे. ग्राहकांचा रोष लक्षात घेता, जुने पारंपरिक मीटर परत बसवणे हीच योग्य दिशा ठरेल.” चर्चासत्रात उपस्थित लोकांना संभाव्य आंदोलनाच्या स्वरूपाबाबत माहिती देण्यात आली आणि प्रत्येकाने मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर तयारी करून ठेवण्याचे आवाहन कौठकर यांनी केले.
नागरिकांचे स्पष्ट मत:
“स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणी वाढवणारे आहेत. त्यांना हटवून जुने मीटर पुन्हा बसवावेत,” अशी एकमुखाने जोरदार मागणी करण्यात आली.