ankush tv18 news
मध्यरात्रीच्या सुमारास 5 जणांनी जबरदस्तीने घरात घुसून
बदनापूर तालुक्यातील एका गावामध्ये 37 साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वाच्या… अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल..
जालना, दि. 25 फेब्रुवारी 2026 — मा. जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांनी सामूहिक बलात्कार प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत पाच आरोपींना प्रत्येकी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांची कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. हा निकाल मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-3 श्री. कपिल विजय मोरे यांनी दिला.
या प्रकरणात आरोपी क्रमांक 1 संदीप काशिनाथ कोळे (वय 22), आरोपी क्रमांक 2 सुंदरलाल निसाराम कोळे (वय 30), आरोपी क्रमांक 3बबन कुशाभाऊ खांडे (वय 40), आरोपी क्रमांक 4 बाबासाहेब संतोष कोळे (वय 34) आणि आरोपी क्रमांक 5 लक्ष्मण बाबुराव सोनवणे (वय 26, रा. दाभाडी, ता. बदनापूर, जि. जालना) यांना दोषी ठरवण्यात आले.
घटनेनुसार, दिनांक 28 जुलै 2022 रोजी रात्री पीडित महिला घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला. त्यानंतर ती टेंभुर्णी बसस्थानक परिसरात आढळून आली. पीडितेने सांगितले की आरोपींनी तिला मोटारसायकलवर बसवून दाभाडी परिसरातील शेतात नेले आणि तिच्या इच्छेविरुद्ध आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला टेंभुर्णी बसस्थानकात सोडून दिले. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 448/2022, कलम 376(ड) व 376(2) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. रुश्मीकांत मुंकीम आणि अतिरिक्त सरकारी वकील ॲड. शशांक डोंगरे यांनी काम पाहिले. तपासादरम्यान एकूण 37साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांचा समावेश होता.
न्यायालयाने उपलब्ध पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे सर्व आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.




