Ankush tv8 news network
Delhi- नवी दिल्ली कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (कृभको) तर्फे दिला जाणारा मानाचा ‘सहकारिता विभूषण पुरस्कार २०२४-२५’ यंदा जळगाव (महाराष्ट्र) येथील शैलजादेवी दिलीप निकम यांना प्रदान करण्यात आला. देशभरातून केवळ दोनच व्यक्तींना हा सन्मान मिळाला असून त्यात निकम यांचा समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुरस्कार समारंभ कृभको च्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने २५ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथील अशोका हॉटेल, चाणक्यपुरी येथे संपन्न झाला. कार्यक्रमात कृभको चे अध्यक्ष श्री. व्ही. सुधाकर चौधरी, एशिया पेसिफिक चे संचालक चंद्रपालसिंग यादव, इफको चे चेअरमन दिलीप सिंघानिया , एनसीसीएफ चे चेअरमन विशाल सिंग , माजी केंद्रीय कृषी मंत्री मोहनभाई कुंडारिया , कृभको चे व्यवस्थापकीय संचालक एस.एस.यादव यांसह सहकार क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शैलजादेवी निकम यांना सहकारी चळवळ बळकट करण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत ‘सहकारिता विभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती निकम यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर यांचेकडून अभिनंदन होत आहे .
श्रीमती निकम यांच्या कार्याचा गौरव करताना कृभको अध्यक्ष व्ही. सुधाकर चौधरी म्हणाले, “शैलजादेवी निकम यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि सहकार विकासासाठीचे योगदान हे भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
शैलजादेवी निकम यांचे सहकार क्षेत्रातील मोलाचे योगदान
शैलजादेवी निकम यांनी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीत अग्रणी योगदान दिले आहे.१९९५ ते १९९७ या काळात त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष व संचालक म्हणून कार्यरत राहिल्या.कृभकोच्या पहिल्या महिला संचालिका होण्याचा मानही त्यांना मिळाला. त्या महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाच्या उपाध्यक्ष पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.१९९७-९९ या काळात त्या राष्ट्रीय महिला सल्लागार समिती (भारत ) च्या सदस्या होत्या.याशिवाय, त्यांनी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था, तावसे खु. विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि जळगाव जिल्हा सहकारी बँक यांसारख्या संस्थांमध्ये अध्यक्ष व संचालक म्हणून काम करत सहकारीता क्षेत्राच्या विकासाला गती दिली. म्हणून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला .