ankush tv18 news network

Jalgaon
एकीकडे अफाट उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानाने गॅस टंचाईचे कारण देत भक्तांना मिळणाऱ्या लाडू प्रसादात कपात केल्याची बातमी दिसली..
तर दुसरीकडे त्याच परिस्थितीत सौर ऊर्जेच्या (Solar Energy) साहाय्याने कोणतीही कपात न करता पूर्वीइतकाच महाप्रसाद देणारे शेगाव संस्थान..
ही केवळ दोन देवस्थानांची तुलना नाही.. तर ‘नियत आणि नियोजन’ यातील फरक अधोरेखित करणारे उदाहरण आहे..
थोडे आकडेही पाहिले तर विचार अधिक गंभीर होतो. शिर्डी संस्थानचे वार्षिक उत्पन्न साधारण ९०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर शेगाव संस्थानचे उत्पन्न केवळ १५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत शिर्डी शेगावपेक्षा अनेक पटीने मोठे आहे. तरीही भक्तसेवा, सुविधा, पारदर्शकता आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत अनेक भाविकांना शेगावचा अनुभव अधिक समाधानकारक वाटतो.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे देवस्थानाचे उत्पन्न किती आहे यापेक्षा ते चालवणारे संचालक मंडळ कसे आहे, त्यांची नीयत काय आहे आणि त्यांचे नियोजन किती दूरदृष्टीचे आहे यावर सर्व काही अवलंबून असते..
व्यवस्थापनातील प्रत्यक्ष फरक पाहिला तर तो आणखी स्पष्ट दिसतो.
शेगावचे अत्याधुनिक पार्किंग पाहिले की कोणीही आश्चर्यचकित होईल.. मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांतही क्वचितच दिसेल अशी व्यवस्था तिथे आहे.. एकमेकांच्या विरुद्ध २५ पार्किंग लेन, कुठल्या लेनमध्ये जागा रिकामी आहे हे सांगणारे डिजिटल डिस्प्ले, आणि येण्या-जाण्याचे स्वतंत्र मार्ग— ही संपूर्ण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्णपणे मोफत आहे.
याउलट शिर्डीत अनेक ठिकाणी खाजगी पार्किंगवाले एका तासाचे २०० रुपये किंवा त्याहून अधिक पैसे घेताना दिसतात. श्रद्धेने आलेल्या भाविकांकडून अशा प्रकारे पैसे उकळले जातात, हे खरोखरच विचार करायला लावणारे आहे.
मोफत सेवांचे मॉडेल हा शेगाव संस्थानचा आणखी एक आदर्श आहे. रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकापासून मंदिरापर्यंत पूर्णपणे मोफत बस सेवा तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि दूरवरून आलेले भाविक कोणत्याही त्रासाशिवाय मंदिरात पोहोचू शकतात.
शिर्डीसारख्या अफाट उत्पन्न असलेल्या देवस्थानानेही अशा सेवाभावी योजनांचा विचार करणे अपेक्षित आहे.
भक्तनिवास आणि स्वच्छता या बाबतीतही शेगावचा अनुभव वेगळाच असतो. तिथे गेल्यावर जाणवणारी स्वच्छता अनेकांना युरोपियन दर्जाची वाटते. अत्यल्प दरात मिळणाऱ्या स्वच्छ खोल्या, शिस्तबद्ध व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांची नम्रता ही पंचतारांकित हॉटेललाही लाजवेल अशी असते.
याउलट शिर्डीत अनेक वेळा सामान्य भक्तांना निवास मिळवताना अडचणी येतात. कधी राजकीय शिफारसी, कधी ओळखी—या गोष्टींमुळे भाविकांचा अनुभव कधी कधी कडू होतो.
सामाजिक शिस्त ही शेगावची आणखी एक मोठी ताकद आहे. मंदिर परिसरात भिकाऱ्यांची गर्दी दिसत नाही, कोणीही भक्तांकडे हट्टाने दान मागत नाही. भाविकांनी दिलेला प्रत्येक पैसा हा अत्यंत पारदर्शक पद्धतीने समाजकार्यासाठी वापरला जातो.
शेगाव संस्थानने मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, शैक्षणिक संस्था आणि विविध लोकसेवा प्रकल्प उभे केले आहेत.
म्हणजेच भक्तांनी दिलेल्या पैशांचा उपयोग केवळ मंदिरापुरता न राहता समाजाच्या उन्नतीसाठीही होताना दिसतो.
देवस्थानाचे संचालन करणाऱ्या मंडळाने हे लक्षात घ्यायला हवे की “भक्त सेवा हीच खरी ईश्वर सेवा” आहे.
जेव्हा संचालक मंडळ निस्वार्थी असते, दूरदृष्टीने काम करते आणि त्यांचे लक्ष केवळ भक्तांच्या सोयीवर असते, तेव्हा गॅस टंचाईसारखी अडचण प्रसादात अडथळा ठरत नाही. उलट त्यावर उपाय शोधले जातात.. जसे शेगावने सौर ऊर्जेचा वापर करून केले..
म्हणूनच शेगाव संस्थानचे स्वयंपूर्ण, शिस्तबद्ध आणि पारदर्शक मॉडेल आज भारतातील प्रत्येक मोठ्या देवस्थानासाठी एक आदर्श आहे.
देवस्थानाचे वैभव त्याच्या सोन्या-चांदीत नसते, तर भक्तांना दिलेल्या सन्मानात, सोयींमध्ये आणि व्यवस्थेच्या प्रामाणिकपणात असते.





